माझी चैत्रगौर ( आई )
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी,
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी,
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी,
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी,
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला,
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला.
( साभार गुगलतात्यांचा खजिना )
चैत्र महीना लागतो तो हिरव्या पालवीची चाहूल घेवूनच . वसंताच्या चाहूलीने झाडे हिरव्या रंगाने मोहरून बहरु लागतात . उन्हाची चाहूल लागते , सुर्यदेव हळूहळू तापायला सुरवात करतात . काळ्या माठाच्या थंडगार पाण्याला वाळ्याच्या वासाची संगत , केशरटपिवळ्या पुरणपोळीने होळीची लज्जत वाढते . मग येतो चैत्र गुढिपाडवा नवसंवत्साराची करुन सुरवात . रंगीबेरंगी साडी लेवून , पांढरी शुभ्र साखरेची गाठ , हिरव्याकंच कडूलिंबाच्या पाल्यांने तिची नजाकत अजूनच वाढते . गौरीच्या आगमनाने तर वसंताची रंगत बहरायला सुरवात होते .
परिक्षा झाल्या की आईची लगबग सुरु व्हायची ती हळदीकुंकावासाठी . स्वताःच्या सोयीने हळदीकुंकवाचा दिवस ठरला जायचा , आदले दिवशी पिवळे ,करड्या रंगाचे हरभरे पितळेच्या बादलीत , मोठ्या पातेल्यात गार पाण्यात रात्रभर डुंबत बसायचे . सकाळी सकाळी त्यांच्या सृदृढेत भरपूर वाढ झालेली असायची , आता त्यांची रवानगी गोणपाटावर व्हायची त्यातले अंगकाठी न बदलेले काढून परत पाण्यात नाहीतर उन्हात जायचे . हिरव्या ,हिरव्या मोठ्या मोठ्या कैऱ्या सालीकाढून किसल्या जायच्या . पिवळी धम्मक हरभऱ्याची डाळ पाण्यात भिजवत ठेवायची .
पितळी गौरीचे फेशियल छान लिंबूसाखर लावून व्हायचे . कोमट तेल,पाण्याने मसाज व्हायचा , कोरड्या रुमालाने घासून अंग कोरडे करायची , मग सकाळी साग्रसंगीत पूजा करुन ठेवणीतल्या रेशमीखणाची अंगभर साडी नेसून दागीने , हार, फुले लेवून खास तिच्यासाठी तयार केलेल्या ( पाटावर ) कोंदणात बसायची .
आस्मादिकांचे माहेर रेल्वे काॕलनीत स्टाफक्वार्टसमध्ये त्यामुळे शेजार सगळा काॕस्मोपाॕलीटिन ! त्यामुळे आमच्याकडे आणी एकदोन घरातच हळदीकुंकावाचा समारंभ असायचा . त्यातही आई भयंकर हौशी ! पंढरपुरची , उत्पात घराण्यातली .मोठ्या बहिणी आईला सगळ्या कामात मदत करुन , अंगणात सुंदर रांगोळी रेखाटायच्या . मी आणी धाकटी बहीण ह्यांच्याकडे आमंत्रण देण्याचे काम असायचे . काॕलनीभर , नातेवाईक यांचेकडे आदले दिवशीच पोच व्हायचे . सगळेजण ह्या आमंत्रणाची वाट पाहत असायचे . आई समईवर गौर बसवायची तिला चापूनचोपून , सुंदर , भराभरा वेगळ्यावेगळे पद्धतीने साडी नेसवण्यात तर तीचा हातखंडा . मग गौरीच्या प्रभावळीवर बाहुलीचा मुखवटा बसवायचा तिला छान दागिने घालायचे , नटवायचे . कधी झोपाळा , कधी बैलगाडीत , कधी हत्तीवर ,कधी वनराणी फुलराणी अश्या विविध रुपात गौर बसायची . आम्हा बहीणीची खेळणी तिच्या पुढ्यात मांडायची .
पांढऱ्या शुभ्र एकसारखी मुरड घातलेल्या करंज्या , गोलगोल काटेरी खुसखुशीत चकली , टपोरे एकसारखे गोल गरगरीत वळलेले बेसनाचे ,रव्याचे लाडू , पिवळी धम्मक शेव , सोनेरी रंगावर तळलेले शंकरपाळे हे सगळे ठेवणीतल्या डिशमध्ये बसून वेगळ्यावेगळ्या रंगानी भरलेल्या ग्लासवर ठिय्या मारुन बसायची .खरतर उन्हाळ्याच्या सुट्टीतील खाबूगिरीसाठी ह्यांची बेगमी असायची . घरी येणारी प्रत्येक स्त्री जणू माहेरवाशिणच ! तीला अलगद हळदकुंकू , चांदिच्या मोराच्या पोटातले अत्तर लावायचे , हलक्या हाताने गुलाबदाणीतले थंडगार पाणी शिंपडताना आम्हाला फार मज्जा यायची . चुरमुरे आणी काकडीच्या गोलगोल चकत्या तिच्या हातावर ठेवायच्या .खिरापतीला साखरखोबरे असायचेच .! मग तिच्या हातावर हिरव्या हिरव्या बदामाच्या पानावर पिवळीधम्मक आंब्याची डाळ त्यातून अधूनमधून डोकावणारी हिरवी मिरची आणी कोथिंबीर वरून घातलेली चरचरीत फोडणी अहाहा ! आणी जोडीला परफेक्ट चवीचे वेलदोडे घालून केलेले पन्हे ! क्या बात है ! अशी दाद बऱ्याच जणांनकडून यायची तेव्हा आईच्या चेहऱ्यावरचे कृतकृत्य झाल्याचे भाव असायचे .
असा गौराईसोबतचा पाहुणचार घेवून मंडळी तृप्त व्हायची पुढच्यावर्षीच्या हळदीकुंकावाची वाट बघत !! !!
अशी अन्नदा ,सुखदा, , परिश्रमाने ,कल्पकतेने नटवणारी ,मिरवणारी कष्टाळू , मायाळू ,प्रेमळ , सुगरण गौराई म्हणजे साक्षात आईचेच रुप !!
सौ आरती राजाराम परिचारक .
पंढरपूर.
Comments
Post a Comment