कलाकौशल्य
प्रत्येक कलाकृती ही कला आणि कौशल्य या दोघांची मिळूनच बनलेली असते. कला अंगभूत असते तर कौशल्य मिळवता येते.
समजणे आणि उमजणे यात जो फरक आहे तोच शिकून येणे आणि उपजत असणे यात आहे. याविषयी "कट्यार काळजात घुसली " या नाटकात कविराज बाकेबिहारी यांच्या तोंडी खूप छान वाक्य दिली आहेत जे वास्तव आहे. त्यात मूळ फरक हा "विद्या आणि कला" असा आहे. विद्या आत्मसात करता येते परंतु कला ही आत आधीच असावी लागते. ती आत असलेली कला केंव्हा कशी प्रकट होईल ह्याला कुठलीही काल अथवा वयाची मर्यादा नाही. फक्त त्याठिकाणी "तानसेन जन्मालाच यावा लागतो ह्यापेक्षा तानसेन घडावा अशी परिस्थिति निर्माण व्हावी लागते...". हे लागू पडतं. संगीताची सरगम आणि आरोह अवरोह कळाले, रागांचे स्वरसमूह कळाले तरी ते त्या व्यक्तीच्या कंठातून निघतीलच असे नाही. किंवा एखाद्याला रागमालिका न कळूनही अचूक वाजवता अथवा गाता येऊ शकते. त्यावेळी त्याला स्वरांचे ज्ञान असते परंतु स्वरांची ओळख नसते असे म्हणता येईल. "ओळख असणे" ही विद्या आणि "ज्ञान असणे" हे उपजत असे म्हणता येईल.
उपजत कला आणि मग बाजूची परिस्थिती, कलेचे संस्कार, कलाकाराचे कष्ट यातून कलाकार तयार होतो.
कोणतीही कला आपल्याला आत्मसात करण्यासाठी ती लहान वयात शिकणे हे जितके कमी महत्वाचे आहे, तितकेच जास्त महत्वाचे हे आहे की आपण ती कला किती जिद्दीने आणि चिकाटीने शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. योग्य मार्गदर्शन, प्रबळ इच्छाशक्ति, सातत्य, संयम आणि आत्म विश्वास यांच्या जोरावर तुम्ही पन्नाशीत सुद्धा एखादी कला आत्मसात करू शकता.
यात दुमत अजिबात नाही की, लहान वयात आपली शिकण्याची क्षमता जास्त प्रभावी असते. परन्तु तीव्र इच्छाशक्ति ही शारीरिक क्षमतांवर केव्हाही मात करू शकते ही गोष्ट तितकीच खरी!
तुम्हाला काय वाटते ?
कमेंटमध्ये आपले मत नक्की लिहा (कृपया अयोग्य अथवा विषयाला सोडून इतर कमेंट्स नयेत )
Comments
Post a Comment